शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे, वीजबिलापासून मुक्तता मिळावी आणि लोडशेडिंगची चिंता नसावी या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषणविरहित सौर कृषिपंप उपलब्ध करून देणारी ‘मागेल त्यालासौर कृषिपंप’ योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना असणार आहे. सदर
योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणवर सोपविण्यातआली आहे.सौर कृषिपंप योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात असलेले विविध प्रश्न व शंका यांची उत्तरे या ब्लॉगच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेच्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करून महाराष्ट्र शासनाच्या या अभिनव योजनेचा लाभ घ्यावा.
- सौर कृषिपंप म्हणजे काय ?
उत्तर :- सौर कृषिपंप हा सूर्याच्या किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासून चालणारा पंप आहे. सौर पंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. - सौर कृषिपंपाचा उपयोग काय आहे ?
उत्तर :- सौर कृषिपंप हा शेततळे, विहीर, बोअरवेल इ. शाश्वत पाण्याच्या स्रोतामधून पाण्याचा उपसा करण्याचे काम करतो. उपसा केलेले पाणी हे पाईपद्वारे शेतातील पिकांना देण्यास मदत होते. - सौर कृषिपंप कसा काम करतो ?
उत्तर :- सौर कृषिपंप सौर ऊर्जेवर म्हणजेच सूर्याच्या किरणांपासून काम करतो. जेव्हा सूर्यकिरणे सोलर पॅनल्सवर पडतील तेव्हा डीसी ऊर्जा निर्माण होऊन सौर कृषिपंप कार्यान्वित होतो व पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो
सौर कृषिपंप फायदे
- वीज कपात, कमी दाबाचा वीजपुरवठा, सिंगल फेज समस्या किंवा मोटर जळाल्यामुळे प्रभावित होत नाही.
- सौर कृषिपंप दुर्गम भागात स्थापित केले जाऊ शकतात, जेथे वीजखांब टाकणे कठीण आहे.
- डिझेल पंपाच्या तुलनेत सौर कृषिपंपाचा देखभाल खर्च फारच कमी असून हा पंप दीर्घकाळ टिकतो.
- सौर कृषिपंपाला लुब्रिकेंटची/तेलाची आवश्यकता नसते आणि त्यामुळे पाणी, माती दूषित होण्याची शक्यता नसते.
- सौर कृषिपंपाचे संचालन अतिशय सोपे असून अत्यंत फायदेशीर आहे.
- सौर कृषिपंपामुळे आपल्याला दिवसा पाण्याचा उपसा करणे शक्य होते.
- ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजना’ काय आहे ?
उत्तर :- ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरिता पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येणार आहेत.
- ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’चा फायदा कोणाला मिळणार आहे ?
उत्तर :- ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपरिक कृषिपंपाकरिता वीजपुरवठा देण्यात आला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. - मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची काय पद्धत आहे ?
उत्तर :- या योजने अंतर्गत नवीन सौर कृषिपंप मिळण्याकरिता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. वेबपोर्टलवरून किंवा https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index.php या link वर जाऊन, अर्जदारास A-1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. - या योजने अंतर्गत अर्जासोबत कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उत्तर :- शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचा ७/१२ उतारा (जलस्रोताची नोंद आवश्यक आहे), आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती / जमाती लाभार्थ्यांसाठी) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे. अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना-हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना-हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्काकरिता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, ई-मेल पत्ता (असल्यास), पाण्याचा स्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.
- अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल ? उत्तर :- लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल तसेच विविध टप्प्यावर अर्जाच्या सद्यः स्थितीची माहिती अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल. या व्यतिरिक्त, अर्जदारास वेबपोर्टलवर जाऊन लाभार्थी क्रमांकाच्या आधारे अर्जाची सद्यः स्थिती बघता येईल.
- सौर कृषिपंप लावताना जागेची निवड कशी करावी ? उत्तर :- सौर कृषिपंप पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्यासाठी जिथे सूर्याची किरणे सोलर पॅनलवर पूर्णपणे पडतील, कुठल्याही प्रकारची सावली अथवा आडोसा त्यावर येणार नाही अशी जागा निवडावी तसेच पॅनलवर धूळ, घाण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. सोलर पॅनल सूर्यकिरणांच्या दिशेने फिरण्यास वाव असेल अशा ठिकाणी बसविण्यात यावा तसेच जमिनीचा भूभाग हा समपातळीवर असावा. सोलर पॅनल शक्यतो पाण्याच्या स्रोताजवळ व अशा ठिकाणी लावावा जेणेकरून तो सहज स्वच्छ करता येईल. सोलर पंप हा सोलर पॅनलच्या जवळच असला पाहिजे. परंतु ज्या क्षेत्रामध्ये सिंचन करावयाचे आहे त्याच क्षेत्रात असला पाहिजे.
- सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतील ? उत्तरः- सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून सौर कृषिपंप किमंतीच्या १० टक्के रक्कम व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून सौर कृषिपंप किमंतीच्या ५ टक्के एवढी रक्कम भरावी लागेल.
- सदर योजनेकरीता लागणाऱ्या सौर कृषिपंपाची क्षमता कशी निर्धारित करावी ? उत्तर :- या योजनेअंतर्गत २.५ एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमतेचा, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषिपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषिपंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
- सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी ?
उत्तर :- सौर कृषिपंपाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२- ३४३५ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राकडे आलेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठविण्यात येईल. सदर एजन्सीकडून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल. - अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्यास काय करावे ?
उत्तर :- एखाद्या अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास
महावितरणच्या तालुका स्तरावरील उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय
महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी महावितरणचे
टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ उपलब्ध करून
देण्यात आले आहेत.
WhatsApp Group
Join Now
Instagram Page
Follow Now
शेती पंप