मिलेटस् म्हणजे भरडधान्ये वा तृणधान्ये, ज्याला इंग्रजी भाषेत Millets असे म्हणतात. Millets ला Nutricereals वा Superfood म्हणतात. भरडधान्याचा इतिहास ५००० ते ६००० वर्षे पूर्वीपासूनचा आहे. जेव्हा मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भासत होती, त्याला अनुसरूनच पहिली हरितक्रांती घडविण्यात आली. गव्हाचे-तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ लागले, वेगवेगळ्या जाती, वाण आणले गेले अन् देशाची पोटाची भूक भागविण्यात आली. परंतु परिणामी आपली आरोग्यदायी भरडधान्ये, तृणधान्ये या हरितक्रांतीच्या धबडग्यात वेगाने बाजूला फेकली गेली. तसेच ही भरडधान्ये म्हणजे डोंगर, कड्याकपारीत राहणाऱ्या गरीब लोकांचे अन्न म्हणून हिणवले गेले आणि आपल्या सारख्या लोकांच्या जेवणाच्या थाळीतील खाण्याची जागा घेतली गव्हाच्या चपाती-पोळीने, मैदा, पाव, बिसकुटाने, तांदळाच्या भाताने अन् इथूनच आरोग्याच्या समस्यांचे दुष्टचक्र सुरू झाले.
पर्यावरणीय फायदा
संपूर्ण देशभर असणारी दुष्काळी परिस्थिती व शेतीच्या पाण्याची उपलब्धता पाहता हे भरडधान्ये पीक कुठेही येऊ शकते, अगदी एकदोन पाण्यामध्ये वा फक्त पावसाच्या पाण्यावर सुद्धा, खते, औषधे, कीटकनाशके रसायने लागत नाहीत म्हणजे पर्यावरणप्रिय शेती असे समजूया. भरडधान्ये शेती म्हणजे जंगल शेती / naturally grown & minimum care crops अर्थात कसलीही इनपुटस न देता, अगदी तीन-चार महिन्यात छान पीक काढणीस तयार होते. आता आपले डोळे उघडले आहेत, आता आपण परत आपल्या पन्नास वर्षापूर्वीच्या अन्नाकडे वळायचे आहे आणि परत आपल्याला पूर्वीच्या प्रमाणे सुदृढ व्हायचे आहे.
एका शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार एक किलो गहू तयार करण्यासाठी १००० लीटर पाणी लागते. एक किलो तांदूळ (paddy rice) तयार करण्यासाठी ८००० ते ९००० लीटर पाणी लागते. परंतु १ किलो भरडधान्ये तयार करण्यासाठी फक्त २०० लीटर पाणी लागते, म्हणजे भरडधान्याच्या तुलनेने गव्हाला तांदळाला जवळजवळ चाळीस ते पन्नास पट पाणी लागते. म्हणजे तुम्ही तुलना करा किती मोठी अन्न सुरक्षा आपण निर्माण करू शकतो, आता यामागील अर्थकारण पाहुया. साधारणपणे ८० ते १५० रूपये किलो या दराने बाजारात भरडधान्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत, म्हणजे यातून शेतकऱ्यांचे फार मोठे अर्थकारण साधता येणार आहे.
आरोग्यदायी लाभ
गहू आणि तांदूळ (paddy rice ) यामध्ये ग्लुटेन नावाचे एक प्रथिने असते, जे पचायला जड असते, ज्यामुळे मधुमेह व लठ्ठपणा वा इतर आजार बळावले जातात. आता भरडधान्येच कां खायची ? कारण त्यामध्ये ग्लुटेन नसते, हे गव्हा तांदळात असणारे ग्लुटेन निरनिराळ्या आजारांना रोगांना आमंत्रण देते. भरडधान्यात असणारे मुबलक फायबर्स पोट साफ करण्यासाठी मदत करतात, जेणेकरून पोटाचे विकार दूर होतात, कारण बहुतेक आजारांचे मूळ कारण पोट साफ न होणे हे आहे. परिणामी मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब, कर्करोग, सांधेदुखी वा इतर विविध शारीरिक विकार. हे आजार विकार दूर करण्यासाठी भरडधान्ये फारच हमखास गुणकारी आहेत. भरडधान्ये ही ग्लुटेन मुक्त अन्न आहे, सध्या सर्वत्र चर्चा आहे ना ते हेच, म्हणजेच भरडधान्ये आपण आहारात समाविष्ट केल्याने हे जीवनशैलीचे आजार, विकार, रोग आपण सहज टाळू शकतो.
विविध भरडधान्यांची यादी
- Sorghum Millet-ज्वारी
- Pearl Millet-बाजरी
- Finger Millet-नाचणी / रागी
- Foxtail Millet-राळे
- Barnyard Millet-वरी/ वारीचे तांदूळ
- Little Millet-कुटकी
- Browntop/Green Millet-हिरवी कांगनी
- Kodo Millet-कोडो/ कोदरा
- Sudo Millet-राजगिरा